मराठी क्रियापदांचे प्रकार marathi kriyapadache prakar
क्रियापदांचे प्रकारक्रियापदांचे तीन प्रकार आहेत.
१) सकर्मक क्रियापद २) अकर्मक क्रियापद ३) संयुक्त क्रियापद
१) सकर्मक क्रियापद
वाक्यातील क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास जेव्हा कर्माची जरुरी लागते; त्याला सकर्मक क्रियापद म्हणतात; म्हणून ‘करतो’ हे सकर्मक क्रियापद आहे.
खालील वाक्य पहा
– राजेश अभ्यास करतो.
वरील वाक्यात करतो हे क्रियापद आहे.
करण्याची क्रिया करणारा राजेश; म्हणून राजेश हा कर्ता आहे.
करण्याची क्रिया अभ्यासावर घडते; म्हणून अभ्यास हे कर्म आहे.
म्हणजेच,
राजेश अभ्यास करतो.
↓ ↓ ↓
कर्ता कर्म क्रियापद
खालील वाक्य पहा
– राजेश करतो. (येथे कर्म काढून टाकले आहे.)
वरील वाक्याला काहीच अर्थ नाही.
म्हणजेच, वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही.
म्हणजेच, करतो या क्रियापदाला कर्माची जरुरी आहे. सकर्मक म्हणजे कर्मासहित (बरोबर, सह) असते ते.
म्हणून, राजेश अभ्यास करतो.
↓ ↓ ↓
कर्ता कर्म सकर्मक क्रियापद
२) अकर्मक क्रियापद
ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी लागत नाही व क्रिया कर्त्याशीच थांबते तेव्हा त्या क्रियापदाला अकर्मक क्रियापद म्हणतात, म्हणून
‘पळतो’ हे अकर्मक क्रियापद आहे.
खालील वाक्य पहा
राजेश पळतो.
वरील वाक्यात पळतो हे क्रियापद आहे.
पळण्याची क्रिया करणारा राजेश; म्हणून राजेश हा कर्ता आहे.
राजेश पळतो
↓ ↓
कर्ता क्रियापदम्हणजेच, या वाक्यात पळण्याची क्रिया कर्ता करतो व ती कर्त्यापाशी थांबते.
म्हणून,
‘राजेश पळतो’ हे वाक्य पूर्ण अर्थाचे आहे.
पळतो या क्रियापदाला कर्माची जरुरी नाही.
– अकर्मक म्हणजे कर्म नसते ते.
म्हणून, राजेश पळतो
↓ ↓
कर्ता अकर्मक क्रियापद
३) संयुक्त क्रियापद
धातुसाधित व सहायक क्रियापद मिळून बनणाऱ्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद म्हणतात; म्हणून ‘खेळू लागला’ हे संयुक्त क्रियापद आहे.वाक्यातील अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या –
आपण दोघे मैदानात खेळू.
खेळू या शब्दात खेळण्याची क्रिया आहे.
खेळू हा क्रियावाचक शद्ब आहे.
खेळू हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो.
म्हणजेच ‘खेळू’ हे क्रियापद आहे.
१) राजेश मैदानात खेळू. (वाक्य अर्थपूर्ण नाही)
२) राजेश मैदानात लागला. (वाक्य अर्थपूर्ण नाही)
३) राजेश मैदानात खेळू लागला. (वाक्य अर्थपूर्ण आहे.)
पहिल्या वाक्यात खेळू हा क्रियावाचक शद्ब आहे; पण तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही.
दुसऱ्या वाक्यात लागला हा क्रियावाचक शब्द आहे; पण तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही.
तिसऱ्या वाक्यात खेळू व लागला हे दोन क्रियावाचक शब्द एकत्र आल्याने ते वाक्याचा अर्थ पूर्ण करतात.
म्हणजेच ‘खेळू लागला’ या दोन शब्दांनी मिळून वाक्याचा अर्थ पूर्ण होतो.
इथे खेळू हा शब्द ‘खेळ’ या धातूपासून बनलेला असल्यामुळे तो शब्द धातुसाधित किंवा कृदन्त आहे, तर लागला या क्रियावाचक शब्दाने खेळण्याची क्रिया पूर्ण करण्यासाठी मदत किंवा साहाय्य केले आहे; म्हणून ‘लागला’ हे सहायक क्रियापद आहे.
म्हणून ‘खेळू लागला’ हे क्रियापद धातुसाधित (कृदन्त) व सहायक क्रियापद यांनी मिळून बनले आहे.
खेळू + लागला = खेळू लागला.
(धातुसाधित / कृदन्त) + (सहायक क्रियापद) = संयुक्त क्रियापद.
संयुक्त क्रियापदे : घेऊन गेली, होऊ शकतो, करून टाक, सांगून ये, वाटत असे, जायला पाहिजे, रंगले होते, पाहता आले.